औरंगाबाद: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये फेरबदलाची तयारी पूर्ण झाली असून सत्तार समर्थकांना पदावरून काढण्यात येणार आहे. त्यामुळे सिल्लोड-सोयगाव तालुका कार्यकारिणी बरखास्त करण्याची घोषणा आज जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अनिल पटेल यांनी पत्रकार परिषदेत केली.
विधानसभेसाठी इच्छुकांचे अर्ज मागवण्या बरोबरच तालुका पातळीवर कार्यकारणी बदलण्याचे निर्णय जिल्हा समितीने घेतला आहे. त्यानुसार सिल्लोड- सोयगाव तालुका काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसने जिल्हावार बैठकांचे सत्र सुरू केले होते.
ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी अनिल पटेल यांच्यावर सोपवल्यानंतर पटेल यांनी तालुका कार्यकारिणी वर लक्ष केंद्रित केले. तर शहराध्यक्ष नामदेवराव पवार यांनी शहरातील सर्वच मंडळ तसेच सेलच्या कार्यकारणी ची बैठक घेत फेरबदलाचे तयारी केली आहे.
सत्तार समर्थकांना डच्चू
दरम्यान काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे सिल्लोड आणि सोयगाव तालुका कार्यकारणी ची फेररचना करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या दोन्ही तालुक्यांच्या कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर अब्दुल सत्तार यांचा प्रभाव असलेल्या पैठण, वैजापूर सह इतर तालुक्यातीलही सत्तार समर्थकांना महत्त्वाची पदे दिली जाणार नसल्याचे संकेत काँग्रेस कडून देण्यात आले. विधानसभेसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी काल अखेरची तारीख होती. त्यानुसार काँग्रेसकडे जे अर्ज प्राप्त झाले ते अर्ज वरिष्ठांकडे पाठवण्यात येतील, अशी माहिती नामदेवराव पवार यांनी दिली. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर जिल्हा काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होणार असे संकेत मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीत पक्षाचे काम न करणार्यांनाही थेट बाहेरचा रस्ता दाखवण्याची तयारी जिल्हा काँग्रेसने चालविली आहे. त्यामुळे येत्या काळात काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल होतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. यावेळी शहराध्यक्ष नामदेवराव पवार, जि.प.चे माजी अध्यक्ष प्रभाकर पालोदकर, चंद्रभान पारखे, विलास औताडे, विनोद तांबे, डॉ. पवन डोंगरे आदी उपस्थित होते.











